श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

आमच्या बद्दल


कामगारांच्या इच्छा, आकांक्षा अन् अपेक्षा यांना समर्थ शब्द देणारे कवी नारायण सुर्वे म्हणतात, ‘श्रमिकांना रोटी प्यारी खरी, आणखी काही हवे आहे…’ आणखी काही मिळविण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करणारे व्यासपीठ म्हणून ‘श्रमिक प्रतिष्ठान’ने महाराष्ट्रात वैचारिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेच्या १९९४ साली साजरा झालेल्या रौप्य महोत्सवातून हा उपक्रम साकारला. संघटना म्हणजे आर्थिक मागण्यांचं साधन न राहात समाज नि माणसांच्या सर्वंकष विकासाचं हत्यार बनायला हवं, या उद्देशाने ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे, बँक कर्मचारी संघटनेचे नेते बाबा साठम, आनंदराव परूळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘श्रमिक प्रतिष्ठान’ साकारले. साहित्य, संगीत, क्रीडा, कला, प्रबोधन इत्यादी सर्वांगांनी श्रमिक समाजाचा विकास हे ‘श्रमिक प्रतिष्ठान’ चे ध्येय ठरविण्यात आले.

कॉम्रेड गोविंद पानसरे ‘श्रमिक प्रतिष्ठान’बाबत म्हणतात, ‘‘स्वत:चे आर्थिक जीवन सुधारण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करणाऱ्या कामगारांनी तयार केलेले विचारपीठ म्हणजे ‘श्रमिक प्रतिष्ठान’ आहे. संपूर्ण समाज मुळातूनच बदलल्याखेरीज समाजाचा कोणताही एक विभाग सुखी होणार नाही याचे भान देण्याचा आम्ही श्रमिक प्रतिष्ठानद्वारे प्रयत्न करीत आहोत

जे बदलायचे ते नीट समजल्याखेरीज बदलता येत नाही. संपूर्ण समाज मुळातून बदलायचा तर तो नीट समजायला पाहिजे. तसेच जगातील व भारतातील समाजात होणारे बदल आणि त्यातील गुंतागुंत समजली पाहिजे. त्यादृष्टीने ‘श्रमिक प्रतिष्ठान’ प्रयत्न करीत आहे.

स्वत:च्या आणि समाजाच्या जाणिवा प्रगल्भ केल्याखेरीज समाज बदलता येणार नाही. याचे भान असलेल्या आणि असे भान देऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी तयार केलेला ‘श्रमिक प्रतिष्ठान’ हा एक विचारमंच आहे.

सर्व श्रमिकांचे नेतृत्व करण्याची आणि शोषणमुक्त समाज निर्माण करण्याची जबाबदारी असणारा संघटित कामगारवर्ग हा स्वत:च्याच आर्थिक मागण्यांत अडकून राहिला. धर्म, जात, प्रादेशिकता या संकुचिततेत अडकला. समाजजीवनात आर्थिक बाजूला अंतिमत: निर्णायक महत्व असतं हे खरंच आहे. तथापि, धर्म, जात, संस्कृती, नीतिमत्ता, वैशिष्ट्यपूर्ण समाजरचना यांनाही महत्त्व असतं. या बाबीकडे संघटित कामगारांचं व त्यांच्या नेत्यांचं दुर्लक्ष झालं. ही उणीव दूर करण्यासाठी २००२ सालापासून ‘श्रमिक प्रतिष्ठान व्याख्यानमाला’ सुरू करण्यात आली; जी आता कॉम्रेड अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखली जाते.

एकाच बीजविषयाच्या आठ विविध पैलूंवर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील नामांकित तज्ज्ञांना आमंत्रित करून श्रोत्यांची वैचारिक भूक भागविणारी ही महाराष्ट्रतील एकमेव व्याख्यानमाला आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत आजवर ‘जागतिकीकरण’ (२००२), ‘धर्म’ (२००३), ‘शिक्षण’ (२००४), ‘होय, पर्यायी जग शक्य आहे!’ (२००५), ‘भारताचे बदलते राजकारण’ (२००६), ‘नव्या जागतिकीरणानंतरचे जग व भारत’ (२००७), ‘संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे’ (२००८), ‘एन.जी.ओ.’ (२००९), ‘शेती वाचवा, देश वाचवा’ (२०१०), ‘बदलते मराठी साहित्य व संस्कृती’ (२०१२), ‘लोकशाही जनआंदोलने आणि निवडणुका’ (२०१३), ‘भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ (२०१४) अशा विषयांवर व्याख्याने झाली.

श्रमिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आणि इतर संस्था-संघटनांच्या सहभागाने सन २००८ पासून राज्यस्तरीय कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. पहिले साहित्य संमेलन कोल्हापूरात घेण्यात आले. त्यानंतर ते क्रमश: अहमदनगर, नांदेड, नागपूर, नाशिक येथे घेण्यात आले. यंदाचे संमेलन सावंतवाडी येथे होत आहे.

‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी – पर्यायी दृष्टीकोन’ हा एक वार्षिक ग्रंथ तयार करण्याचा उपक्रम यावर्षीपासून सुरू करण्यात आला असून, महाराष्ट्रतील हा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. श्रमिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध पुस्तके प्रकाशित करत असतानाच गेल्या १०० वर्षांत कोल्हापूरच्या व महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी योगदान दिले अशा कर्तृत्ववान व्यक्तींची जीवनचरित्रे प्रसिद्ध करण्याचा उपक्रमही हाती घेण्यात आला आहे. श्रमिक प्रतिष्ठानच्या या कार्याचा गौरव अनेकांनी केला असून, महाराष्ट्र फौंडेशननेही श्रमिक प्रतिष्ठानच्या कार्याची दखल घेऊन उचित सन्मान केला आहे. श्रमिक प्रतिष्ठानची वैचारिक प्रबोधनाची चळवळ ही अशीच अखंडपणे सुरू राहणार आहे…