श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

•कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन


देशभरात आणि महाराष्ट्रात अखिल भारतीय, प्रादेशिक, दलित, ग्रामीण, आदिवासी, कष्टकरी, हमाल, गुराखी, गजाआडच्या कैद्यांची, सकल, सत्यशोधक, विद्रोही अशीही संमेलने होत आहेत. आपल्या समाजातील वेगवेगळे भाग आणि पोटभाग लिहिते झाले आहेत आणि आणखी होत आहेत. आपापले जीवन लेखणीच्या साहाय्याने चितारण्याची या विभागांना घाई झाली आहे. आजवर न चितारलेले जीवन साहित्यात चितारले जात आहे. हे सारे स्वाभाविक आहे आणि मुख्य म्हणजे चांगले आहे. यामधूनच मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी समाजजीवन संतुलित व समृद्ध होणार आहे.

अनेक प्रकारची अनेक साहित्य संमेलने झाली असली तरी एका लेखकाच्या नावाने आणि एका साहित्याकाच्या साहित्यभोवती गुंफलेले साहित्य संमेलन झाल्याचे आमच्या ऐकिवात नाही. म्हणूनच सन २००८ पासून आम्ही कोल्हापूरातील श्रमिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आणि विविध संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी राज्यस्तरीय कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करत आहोत. २००८ साली कोल्हापूरात झालेल्या पहिल्या साहित्य संमेलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद लाभला. त्यानंतर २०१० साली अहमदनगर, २०११ साली नांदेड, २०१२ साली नागपूर आणि २०१४ साली नाशिक येथे अनुक्रमे दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे साहित्य संमेलन पार पडले. त्यानंतर आता १७ व १८ जानेवारी, २०१५ रोजी सावंतवाडी येथे सहावे राज्यस्तरीय कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अण्णाभाऊंच्या महान साहित्याची व कार्याची दखल घ्यावी, मराठी साहित्य विश्वात अण्णा भाऊ साठे यांचे योग्य असे साहित्य शिरोमणी स्थान मानांकित व्हावे म्हणूनच या साहित्य संमेलनाचे प्रयोजन आहे. हे साहित्य संमेलन कोणत्या एका धर्माचे, जातीचे, पंथाचे, पक्षाचे, गटाचे, समूहाचे नाही तर ते श्रमिकांचे, सर्वहारांचे, दलितांचे, शोषितांचे व व्यवस्थेने पिळल्या गेलेल्यांचे साहित्य संमेलन आहे.

शिक्षणाची परंपरा नसलेल्या पण बंडखोरीची परंपरा असलेल्या मांग जातीत, सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या एका छोट्या खेडेगावात अण्णा भाऊ जन्मले. त्यांनी ग्रामीण, दलित, वर्गीय परंतु बंडखोर साहित्य निर्माण केले. एवढेच न करता ज्यांना वर्ग अंत करावयाचा आहे, जाती अंत करावयाचा आहे त्यांच्यासाठी एक हत्यार निर्माण करून ठेवले आहे. आजही हे हत्यार खूपच महत्वाचे व उपयोगी आहे. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे हे आजन्म भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद व सक्रीय कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांनी अनेक प्रकारात साहित्य लिहिले आणि ते सारे उत्तम लिहिले. कादंबऱ्या लिहिल्या, कथा लिहिल्या, काव्य लिहिले, तमाशे लिहिले, पोवाडे व लावण्या लिहिल्या, छक्कड लिहिली… अनेक प्रकारांनी त्यांनी साहित्य निर्माण केले आणि समाजजीवन चितारले.

कॉम्रेड अण्णा भाऊंनी सांगून ठेवले आहे, की ‘‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या / श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे.’’ मूळ लिखाणात दलित शब्द आहे की श्रमिक शब्द आहे हा वाद विनाकारण आहे. दलित व श्रमिक संपूर्णपणे नसले तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात एकच आहेत आणि एकमेकांत मिसळलेले आहेत आणि त्यांनी एकत्र मिसळूनच संघर्ष करावा असाच अण्णा भाऊंचा विचार होता. अण्णा भाऊंनी समाजातील प्रश्न नुसते मांडले नाहीत, तर या प्रश्नांवरील संघर्षात ते स्वत: सहभागी झाले हे फार महत्वाचे आहे.

मराठी भाषेचे एक राज्य व्हावे आणि या राज्याची राजधानी मुंबई असावी यासाठी साऱ्या मराठी भाषिकांनी अपूर्व असा तीव्र आणि व्यापक संघर्ष केला. या संघर्षात अण्णा भाऊ साठे व त्यांचे कलावंत सहकारी यांचा सहभाग अतुलनीय आहे. त्यांनी ‘माझी मुंबई’ हा वग लिहिला. ‘मुंबईची लावणी’ आणि सीमाभागाची व्याकुळता व्यक्त करणारी ‘माझी मैना’ ही छक्कड हे मराठी भाषेतील अप्रतिम साहित्य तर आहेच; शिवाय त्यातील तर्क आणि प्रेरणाही अप्रतिम अशाच आहेत. मुख्यत्वे समाजातील संबंधित काळातील वर्ग संघर्ष स्पष्ट करून सांगणाऱ्या या जगप्रसिद्ध कलाकृती आहेत, विचारधन आहेत. ‘फकिरा’ ही जगप्रसिद्ध कादंबरी त्यापैकीच एक!

अण्णा भाऊंचे एकूण एक नायक आणि नायिका निकृष्ट दर्जाचे जीवन जगलेले आहेत. तथापि ते सारे बंडखोर आहेत. आपले समाजजीवन विद्रुप करणाऱ्या परिस्थितीविरोधी संघर्ष करणारे आहेत. हे नायक, नायिका नुसतं रडत नाहीत, तर लढतात. कधी यशस्वी होतात तर कधी अपयशी ठरतात, पण लढतात, लढत राहतात. अण्णा भाऊंच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. त्यामुळे चित्रपटसृष्टीही समृद्ध बनली. भारतीय, परदेशी भाषांतही त्यांच्या साहित्याची भाषांतरे झाली आहेत. जेमतेम चार बुके शिकलेल्या अण्णा भाऊंच्या साहित्यवर प्रबंध लिहून अनेकांनी डॉक्टरेट मिळविल्या. एवढे होऊनही साहित्य विश्वाने आणि एकूण समाजानेही त्यांची योग्य दखल घेतली; असे म्हणवत नाही. अनेक दुय्यम दर्जाच्या लेखकांचा मात्र उगाचच उदो उदो होताना दिसतो. अण्णा भाऊंचे स्थान योग्य रितीने स्थापित व्हावे, हाही संघर्षाचाच एक भाग आहे आणि त्यासाठीच हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन…

अण्णा भाऊ साठे यांच्या लिखाण पुरेशी दखल घेतली गेली नाही, ही खंत या उपक्रमामागे आहे. अण्णा भाऊंचा एक विचार होता. नुसता विचार नव्हता तर तसा व्यवहार होता. ते जागतिक दर्जाचे भारतीय साहित्यिक तर होतेच, शिवाय ते प्रत्यक्ष संघर्षात सहभागी होऊन लढलेले कार्यकर्ते होते. अण्णा भाऊंच्या विचारांच्या विरोधकांनी अण्णा भाऊंना दुर्लक्षित केले आणि अनुयायांनी संकुचित केले. हे चित्र बदलावे यासाठीच हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन…

कार्लमार्क्स, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ही अण्णा भाऊंची हत्यारे होती. आजही ही हत्यारे आवश्यक आहेत; नव्हे आज तर ती जास्तच आवश्यक आहेत. म्हणूनच हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन…

अण्णा भाऊंच्या साहित्याचे अभ्यासक, मराठी साहित्याचे अभ्यासक, विश्व साहित्याचे अभ्यासक, साहित्य समीक्षक, कलावंत, कवी, कादंबरीकार, कथाकार, नाटककार, सादरीकरण करणारे कलाकार या सर्वांचा संमेलनात सहभागा व्हावा अशी आमची इच्छा व प्रयत्न आहेत. शाहिर अमरशेख, शाहिर गवाणकर यांच्यासह अन्य साथीदारांना बरोबर घेऊन अण्णा भाऊंनी साकारलेल्या ‘लालबावटा’ कलापथकाबरोबर अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. सकस विचार व अप्रतिम साहित्याचे सादरीकरण याबाबतीत महाराष्ट्राच्या इतिहासात अण्णा भाऊंचे ‘लालबावटा कलापथक’ अजून तरी अव्दितीय आहे.

या संमेलनात साहित्याची जशी चर्चा होईल, तसेच काही सादरीकरण व्हावे असा आमचा प्रयत्न आहे. अण्णा भाऊंबद्दल माया, ममत्व असणारे, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रेम करणारे आणि एकूण मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्यांनी या संमेलनात सहभागी व्हावे असे आम्ही आवाहन करत आहोत.