श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

•कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला...


कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला...

सर्व श्रमिकांचे नेतृत्व करण्याची आणि शोषणमुक्त समाज निर्माण करण्याची जबाबदारी असणारा संघटित कामगारवर्ग हा स्वत:च्याच आर्थिक मागण्यांत अडकून राहिला. धर्म, जात, प्रोदशिकता या संकुचिततेत अडकला. समाजजीवनात आर्थिक बाजूला अंतिमत: निर्णायक महत्व असतं हे खरंच आहे. तथापि, धर्म, जात, संस्कृती, नीतिमत्ता, वैशिष्ट्यपूर्ण समाजरचना यांनाही महत्त्व असतं. या बाबीकडे संघटित कामगारांचं व त्यांच्या नेत्यांचं दुर्लक्ष झालं. ही उणीव दूर करण्यासाठी २००२ सालापासून ‘श्रमिक प्रतिष्ठान व्याख्यानमाला’ सुरू करण्यात आली.

‘श्रमिक प्रतिष्ठान व्याख्यानमाला’ सुरू करण्यापूर्वी के. डी. खुर्द, एस. एस. वाघ, अविनाश पानसरे, मिलिंद कदम, प्रा. विलास रणसुभे हे देशात व महाराष्ट्रात घडणाऱ्या महत्वाच्या घडमोडींवर, दरवर्षाच्या देशाच्याव महाराष्ट्राच्या वार्षिक अंदाजपत्रकावर कोल्हापूर शहरातील तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करू लागले. तेव्हा त्यांचं स्वरूप मर्यादित होते. वक्त्यांना कोणतंही मानधन न देता व्याख्यानास बोलविण्यात येई. त्यांची एक पद्धत तयार केलेली होती. के. डी. खुर्द खडू घेऊन येत. प्रा. रणसुभे स्वत:च्या पैशातून पुष्पगुच्छ घेऊन येत. खुर्द किंवा वाघ वक्त्याला गाड्यावर चहा देत. तर दिलीप पवार किंवा मिलिंद कदम किंवा अविनाश पानसेर तर काही वेळेस फेरीवाला संघटनेचे कार्यकर्ते वक्त्याला आणण्याची व घरी सोडून येण्याची जबाबदारी घेत. काहीवेळेला हे काम पत्रकारही करत आणि अशा व्याख्यानास गर्दी होत होती. अभिनव कार्यक्रम म्हणून दरवषीर् कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकावरही चर्चा घडवून आणली जात असे आणि त्यांचे प्रमुख वक्ते नगरसेवक कॉम्रेड के. आर. अकोळकर होत. या प्रासंगिक व्याख्यानांतून इक संघटित टीम तयार झाली. या कामात वृत्तपत्रांचेही चांगले सहकार्य मिळत होते.

प्रासंगिक विषयांवर व्याख्यानं, चर्चासत्र आयोजित करून जनजागृतीचे प्रयत्न सुरू असतानाच अशा कार्यक्रमाला एका संघटित कायमस्वरूपी व्यासपीठात लपांतर करण्याचे प्रयत्न सर्वच कार्यकर्ते व पत्रकार मित्र करू लागले. यामध्यरे पत्रकार विजय चोरमारे, विकास कांबळे, विश्वास पाटील इत्यादी सहकारी होते. याच काळात गॅट करार, डंकेल प्रस्ताव, जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. गुजरातच्या धार्मिक दंगलीने हिंसाचारची सीमा गाठली. या विषयाला अनुसरून धर्म, जागतिकिकरण अशा मूलभूत विषयांवर चर्चा घडवून आणली पाहिजे, असे मत प्रा. विलास रणसुभे, अविनाश पानसरे, के. डी. खुर्द, जगन फडणीस, प्राचार्य म. द. देशपांडे इत्यादींनी गोविंद पानसरे यांच्यापुढे मांडले. तेव्हा, असं ठरले की, श्रमिक प्रतिष्ठानद्वारा व्याख्यानमाला चालवावी व त्यासाठी होणारा खर्च श्रमिक प्रतिष्ठान व हितचिंतकांकडून गोळा करावा. कामाला गती मिळाली. त्यानुसार जागतिकीकरण हा विषय ठरला. महाराष्ट्रतील नामवंत अभ्यासू, तज्ज्ञांनी या विषयावर व्याख्यानं दिली. पहिल्याच व्याख्यानमालेस कोल्हापूर शहर, ग्रामीण भागातून निरनिराळ्या पक्षांचे कार्यकर्ते व प्रचंड श्रोते मिळाले. वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात बातम्या देऊन पाठिंबा दर्शविला. यामुळे सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. लोकांकडूनच अशी मागणी आली, की दरवर्षी अशी व्याख्यानमाला चालू ठेवावी. त्यानुसार गोविंद पानसरे यांनी व्याख्यानमाला दरवर्षी करण्याचं जाहीर केलं व प्रा. विलास रणसुभे यांच्यावर त्याबाबतची प्रमुख जबाबदारी सोपविली. या कामात त्यांच्या मदतीला अविनाश पानसरे, मिलिंद कदम, के. डी. खुर्द, मिलिंद यादव, एस. एस. वाघ, दिलीप पोवार, प्रा. शशिकांत चौधरी, सतीशचंद्र कांबळे, फेरीवाले संघटनेचे सदस्य आले.

दुसरी व्याख्यानमाला सुरू होण्याच्या एक महिन्यापूर्वीच अविनाश पानसरे यांचे निधन झाले; तरी कॉ. गोविंद पानसरे यांनी व्याख्यानमाला होणारच असे सांगितले. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांची एकमताने या व्याख्यानमालेचे नाव अविनाश पानसरे स्मृती व्याख्यानमाला असे करण्याचा निर्णय घेतला. आज गेली १२ वर्षे अखंडपणे व्याख्यानमाला सुरू असून, एकच मुख्य बीजविषय घेऊन त्याच्या आठ विविध पैलूंवर व्याख्यानं घडवून आणण्याचा हा महराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. महाराष्ट्रात ख्यातकीर्द पावलेल्या या व्याख्यानमालेने आत्तापर्यंत अनेकविध विषयांवर व्याख्यानं, चर्चा घडवून आणली. इतकेच नव्हे, तर प्रगल्भ श्रोतावर्गही तयार केला आहे.