श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

•कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला...


श्रमिक प्रतिष्ठान आयोजित कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला (वर्ष ११ वे सन २०१२)
बदलते मराठी साहित्य व संस्कृती

जागतिकीकरणानंतर राजकीय, अर्थिक, साजिक क्षेत्रात मुलभूत बदल होत आहेत. अनेक नवनवीन आव्हाने उभे राहत आहेत. १९९० नंतर अस्मिता जागृत करणार्या चळवळी उभ्या राहत आहेत. सर्वत्र तत्वशून्य विचार रूजविण्याचे प्रयत्नही होत आहेत. समग्रतेचा विचार नष्ट करून व्यक्तीवादी विचारास महत्व दिले जात आहे. सर्वत्र सौदेबाजी चालू आहे. अशाप्रसंगी काही चळवळी हिंसेचा मार्ग स्वीकारत आहेत.

या सर्व वास्तववादाचं आकलन मराठी साहित्यिकांना कितपत झाले आहे? टीव्ही, इंटरनेट, मोबाईल्स, चंगळवाद यांचा ग्रामीण व शहरी संस्कृतीवर झालला परिणाम, शिक्षणाचे खाजगीकरण इ. प्रश्न मराठी साहित्यात कोणत्या पद्धतीने उपस्थित केले जातात, त्यांच्या लेखनातून ते जाणवते काय? अशा प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून आणून त्यांची उत्तरे शोधण्यासाठी श्रमिक प्रतिष्ठान आयोजित कॉ. अवि पानसरे व्याख्यानमालेच्या यंदाच्या १० व्या वर्षात ‘बदलते मराठी साहित्य व संस्कृती’ या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

व्याख्यानमालेत ‘मराठी साहित्य व संस्कृती – अर्थ व आशय‘ विषयावर डॉ. नागनाथ कोतापल्ले, ‘महाराष्ट्राचे नवे सांस्कृतिक धोरण’ यावर डॉ. आ. ह. साळुंखे, ‘साहित्य, संस्कृती व राजकारण’ यावर किशोर बेडकीहाळ, ‘संस्कृती व स्त्रियांचे साहित्य’ यावर डॉ. माया पंडित, ‘मल्टिमीडिया माहोलातील मराठी’ यावर दिनकर गांगल, ‘वाड्मयीन साहित्याचे प्रवाह’ यावर कवी सतीश काळसेकर आणि ‘बदलत्या मराठी साहित्याची दिशा’ या विषयावर डॉ. राजन गवस यांचे व्याख्यान झाले. या सर्व एकत्रित व्याख्यानांचे ‘बदलते मराठी साहित्य व संस्कृती’ याच नावाने पुस्तकही प्रकाशित करण्यात आले. अभ्यासकांनी अधिक माहितीसाठी जरूर अभ्यासावे.


ग्रंथाचे नाव : बदलते मराठी साहित्य व संस्कृती
संपादक : प्रा. विलास रणसुभे
प्रकाशक : श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर.
मूल्य : रूपये १२० फक्त

------------------------ ----------------------------------------------


मराठी साहित्य व संस्कृती – अर्थ व आशय : डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

कॉ. अवि पानसरे व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, जागतिकीकरण, उदारीकरणात जगणे कठीण होत आहे. गाव बदलत आहे. लोकसंख्येचे स्थलांतर होत आहे. यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. नवी संस्कृती रूजु पाहत आहे. त्यांचे संदर्भ आताच्या साहित्यातून अपवादाने दिसून येतात. जागतिकीकरणामुळे काही बदल झालेले आहेत. या बदलाचा फायदा मूटभर श्रीमंतांना व काही प्रमाणात मधनयम वर्गाला झाला आहे. परंतु बहुसंख्य लोकांचे जगणे कठिण झाले आहे. हे भीषण वास्तव आपल्याभोवती आहे. हे लेखकाला कसे पाहता येईल? लेखक जेव्हा चाकोरीबद्ध विचारातून मुक्त होईल तेव्हा ते वास्तव त्याला कळेल. संत तुकारात, ज्ञानेश्वर, म. फुले, इ. चाकोरीबद्ध विचारातून मुक्त झाले तेव्हाच ते नव्या पद्धतीने लेखन केले. भीषण वास्तव व बदल याचे भान अल्यामुळे त्यांच्या लेखनास वैचारिक बैटक प्राप्त झाली. मराठी लेखक समकालीन जीवनाबद्दल फार लिहित नाहीत. भूतकाळावर ऐतिहासिक कादंबरी लिहितो. त्यातही व्यक्तिचित्रणाला महत्व अधिक परिस्थितीतला (आर्थिक, सामाजिक, राजकीय) गौण स्थान असते. परिस्थिती व व्यक्ति या दोघांनाही न्याय देऊ शकत नाही. म्हणून रंजकतेचा आधार घेतो. साहित्य व संस्कृतीचा नीट अर्थ समजून घेऊनच लेखकांनी लेखन करावे. तर साहित्य लढण्याचे साधन बनते.

महाराष्ट्राचे नवे सांस्कृतिक धोरण : डॉ. आ. ह. साळुंखे

विषयाची मांडणी करताना डॉ. साळुंखे यांनी सांस्कृतिक धोरण समितीचं अध्यक्ष या नात्याने या धोरणांचा आशय स्पष्ट केला. संस्कृती या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांस्कृतिक क्षेत्रावर अतिक्रमण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचे स्पष्टीकरण केले. शासन व संस्कृती त्याची जबाबदारी याची चर्चा केली. मराठी भाषा, विभागीय भाषा, संस्कृती, लिपी, इतर भाषेतील शब्द, क्रीडा, संमिश्र समाज यासंबंधी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली.

मराठी साहित्य, संस्कृती व राजकारण : किशोर बेडकीहाळ

श्री. बेडकीहाळ यांनी सवस्तर मांडणी करताना राजकारण म्हणजे काय?, बदलत्या राजकीय परिस्थितीत राजकारणाचा अर्थ कसा बदलत आहे हे स्पष्ट करताना माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मॉडेल, इंदिरा गांधींचे राजकारण, १९९० नंतरचे जातीय राजकारण, पक्ष पद्धती यांची चर्चा केली. मराठी साहित्याचा आढावा घेऊन संस्कृतीचे बदलते संदर्भ दिले. मराठी लेखकांच्या अनुभवांमधनये वैविध्य नाही. त्यांना स्थैर्याची आकांक्षा आह. त्यातून जडत्व येते. राजकारणाबद्दल तुच्छता, लोकांच्या प्रश्नाविषयी गुंतागुंतीची अनभिज्ञता तसेच लोकशाही प्रक्रियासंबंधी अनास्था, उदासीनता दिसून येते. ही वृत्ती बहुसंख्य लेगकांमध्ये दिसून येते. साहित्य संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांच्या आश्रयाने चालतात तेव्हा लेखक स्वातंत्र्याने, मुलभूत प्रश्नावर लेखन करू शकत नाही. राजकीय आश्रयात बहुसंख्य लेखक वावरणारे आहेत.

संस्कृती व स्त्रियांचे साहित्य : डॉ. माया पंडित

स्त्रीवादी साहित्यात उमटणार्या चित्रणाचा वास्तवाशी धागा जोडताना डॉ. माया पंडित लिहितात ‘स्त्री ही कधीच एका पातळीवर सारखी असू शकत नाही. श्रीमंत, गरीब, सत्तासंबंध, जाती, रूढी, परंपरा, धर्माची बंधने यातून स्त्रियांचा दुय्यमपणा नेहमीच ठळक होत गेला आहे. मानसिकतेशी तिचा लढा, तिचे प्रश्न, तिच्या समोरची आव्हाने वेगळी असली तरी कुटुंबापासून ते समाजापर्यंत तिचा अस्तित्वासाठी संघर्ष आजही सुरूच आहे. त्यातून स्त्रीमनावर होणारा परिणाम स्त्रीवादी साहित्यामध्ये दिसत असेल तर ते योग्यच आहे. स्त्रीवादी साहित्य हे पाश्चात्त देशातून आयात केलेले फॅड नाही. तर आपल्याच देशातील पुरूषी मानसिकतेमुळे निर्माण झालेली विसंगती आहे. स्त्रीवादी साहित्य हे महिलांना नवी दृष्टी व आत्मभान देणारे आहे. अनेक दडपणावर मात करून लिहिलेले स्त्रीवादी साहित्य आहे. स्त्रीवादी साहित्यात प्रस्थापित विचारसरणीचे वास्तववादी चित्रण आहे.


मल्टिमीडिया माहोलातील मराठी : दिनकर गांगल

टीव्ही, मोबाईल, इंटरनेट माध्यमांनी केलेली क्रांती डोळे दिपवणारी आहे. या माध्यमांनी जगभरातील ज्ञान आपल्यासमोर आणून ठेवले आहे. जच्या पिढीला त्याच्या व्हिज्युएल भाषेत हित्य हवे असते. अशा स्पर्धेत आपले अस्तित्व राखण्यासाठी मराठी साहित्याची पुनर्रचना करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाची ताकद समजून न घेता साहित्य संस्कृतीचा विचार केला तर आपलीच फसगत होणार आहे. वाचनसंस्कृती टिकवायची असेल तर त्यासाठी मराठीचा पारंपरिक ढाचाही बदलला पाहिजे. मल्टिमीडियाची ताकद ओळखून त्याचा योग्य वापर केला तर मराठी साहित्याच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वाड्मयीन साहित्याचे प्रवाह : सतीश काळसेकर

सुप्रसिद्ध कवी श्री. काळसेकर म्णाले, संतकालीन साहित्य हे श्रमाशी निगडित होते. त्याकाळात श्रमला प्रतिष्ठा नव्हती, ती आजही नाही. अशी मांडणी करून ते पुढे म्हणतात, स्वातंत्र्योत्तर काळात व्याकरण शुद्ध-अशुद्ध अशा भेदांमध्ये बर्याच श्रमिकांना इच्छा असूनही लिहिता आले नाही. तरी काही नवे साहित्यप्रवाह आज नव्या दमाने पुढे येत आहेत. दलित, आदिवासी, भटक्याविमुक्त, ग्रामीण, महानगर असे अनेक प्रवाह साहित्यात नव्याने येत आहेत. यामध्ये अनुभवाचे संचित आहे. मराठी साहित्य जगभरातील वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न झाले पाहिजेत. साहित्य संमेलन ही केवळ लेगक व वाचकांची मिरासदारी नसून ती मराठी भाषा बेलणार्यांची आहे. जागतिकीकरणार्या व्यवस्थेत नव्या लेखकांनी शोषित घटकांच्या बाजूने लेखन करणे आवश्यक आहे.

बदलत्या मराठी साहित्याची दिशा : डॉ. राजन गवस

श्रमिक लेखकांचे साहित्य दिशादर्शक ठरणार आहे. विचार व मूल्य यांची बैटक असलेले अठरापगड जातीशी जोडलेले संत व लोकसाहित्य आजच्या जगण्यालाही समकालीन ठरते. ग्रामीण भागात जण्याशी संघर्ष करणारी, नाडलेली माणसेच दर्जेदार साहित्याची निर्मिती करतात आणि तेच मराठी साहित्याची दिशा ठरवतील.