श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

•कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला...


श्रमिक प्रतिष्ठान आयोजित कॉ. अवि पानसरे स्मृती व्याख्यानमाला (वर्ष २ रे सन २००३)
धर्म

धर्म या विषयाभोवती नाना प्रकारचे विचार मांडण्यात येत आहेत. धर्माचा वापर करून समाजात व्देष पसरवला जात आहे, त्याचा वापर करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंधश्रध्दा व धर्मभोळेपणा वाढविला जात आहे. धर्मासंबंधी जगभर मोठे चिंतन झालेले आहे. त्याचा आढावा घेणे, समकालीन भारतीय समाजात धर्मासंबंधी जे प्रश्न निर्माण झाले आहेत त समजावून घेणेही महत्वाचे आहे. म्हणूनच या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रंथाचे नाव : धर्म, समाज आणि राजकारण
संपादक : डॉ. अशोक चौसाळकर
प्रकाशक : लोकवाड्मय गृह, मुंबई
मूल्य : रूपये १५० फक्त

------------------------ ----------------------------------------------


धर्म - मानवी संस्कृती व विकास : डॉ. रावसाहेब कसबे

पूर्वी कधी नव्हती एवढी धर्मचिकित्सेची गरज आज निर्माण झाली आहे. धर्माच्या मानवी जीवनात दोन भूमिका आहेत. त्यातील पहिली भूमिका भयग्रस्त माणसाचे सांत्वन करण्याची आहे, तर दुसरी भूमिका धर्माच्या राजकियीकरणाची आहे. डॉ. कसबे यांनी आपल्या भाषणात प्रस्थापित धर्माची बलस्थाने विशद केली असून सध्याच्या मानवी विकासाच्या संधिकाळात धर्म जीवन जगण्यातील नवा अर्थ कशाप्रकारे प्रतिपादू शकेल याचे विवेचन केले.


धर्म, धर्मश्रध्दा व अंधश्रध्दा : वसंत पळशीकर

श्री. पळशीकर यांनी आपल्या व्याख्यानात काही तात्विक मुद्दे उपस्थित केले. त्यांच्या मते विज्ञान धर्माची जागा घेऊ शकणार नाही. कारण विज्ञानाचे निष्कर्ष ढोबळ व अपुरे असतात. धर्मश्रध्दा या संकल्पनेची मीमांसा त्यांनी प्रा. दि. के. बेडेकर यांच्या त्या विषयीच्या विचारांच्या संदर्भात केली. त्यांच्यामते ज्यांना मूलगामी सामाजिक परिवर्तन करावयाचे आहे त्यांनी धर्मश्रध्देचा अर्थ व आशय समजावून घेतला पाहिजे.

एकोणिसाव्या शतकातील धर्मचिकित्सा : डॉ. यशवंत सुमंत

डॉ. सुमंत यांनी आपल्या व्याख्यानात एकोणिसाव्या शतकातील धर्मचिकित्सेचा व्यापक परामर्श घेतला. त्यामध्ये रानडे यांचा ईश्वरवाद व महात्मा फुले यांचा निर्मिकवाद यांच्यातील भेदाचे साक्षेपाने विवेचन केले. डॉ. सुमंत यांच्या मते हे धर्मचिंतन नागरी समाजाची उभारणी करणारे, नव्या सामाजिक नीतिमत्तेची मांडणी करणारे व अवघे मानवी जीवन समता, न्याय व स्वातंत्र्य या मूल्यांच्या संदर्भात उन्नत करणारे होते. त्यात धर्माचे नीतिरूप अनुस्यूत होते..

धर्माचे समाजातील बदलते स्वरूप : डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे

डॉ. भा. ल. भोळे यांनी धर्माचे समाजात जे बदलते स्वरूप आहे त्याची चिकित्सा करून असे मत व्यक्त केले की त्या काळातील आर्थिक, राजकीय व सामाजिक परिस्थिती त्या त्या काळातील धर्मकल्पनांचा आशय, आकार व आविष्कार निर्धारित करते. डॉ. भोळे यांनी आपल्या व्याख्यानात विविध पाश्चिमात्य धर्मशास्त्र विवेचकांच्या मतांचा टीकात्मक असा आढावा घेतला. वेगवेगळ्या धर्मसुधारणा चळवळींचे मर्मही विशद केले. धर्मातून समाजपरिवर्तनाच्या शक्यता किती आहेत व त्याच्या मर्यादा काय आहेत हेही मोठ्या साक्षेपाने त्यांनी सांगितले. ते म्हणाले, की धर्माची गरज शिल्लक उरू नये अशी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सोडून देऊन मानवी जीवनातून धर्मालाच हद्दपार करण्याची आंदोलने आम्ही करीत बसलो तर ती कधीच यशस्वी होणार नाहीत. शेवटी त्यांनी आजच्या संदर्भात धर्मचिंतनाची दिशात कोणती असावी याबाबतची आपली मते मांडली.

धर्म की धर्मापलिकडे? : डॉ. आ. ह. साळुंखे

डॉ. साळुंखे यांनी आपल्या व्याख्यानात धर्माच्या उदयाची ऐतिहासिक मांडणी करून सांगितले, की मुळात आत्मसंरक्षणाच्या भावनेतून या संकल्पनेचा विकास झाला. पण नंतर मात्र समाजातील सत्ताधारीवर्गांनी धर्माच्या बाबतीत अंधश्रध्दा निर्माण करून लोकांना लुबाडण्याचे राजकारण केले. त्याबाबत त्यांनी तुळशीच्या कथेचा संदर्भ दिला. धर्माच्या पलीकडे जाताना न्यायावर आधारललेले आपले जे भावविश्व आहे त्याचा त्याग न करता ते विधायक, प्रसन्न आणि सुंदर कसे करता येईल यांचा आपण विचार केला पाहिजे.

भारतीय राज्यघटना व धर्म : न्यायमूर्ती पी. बी. सावंत

न्यायमूर्ती सावंत यांनी भघरतीय संविधानात देण्यात आलेले विविध धर्मविषयक अधिकार आणि धर्मनिरपेक्षता यांचे विस्ताराने विवेचन केले. त्यांनी धर्म या संकल्पनेचा अर्थ समजावून सांगून धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ते विशद केले. त्यांनी समान नागरी कायद्याचा पुरस्कार केला पण त्याजबरोबर त्याची अंमलबजावणी करण्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणीही सांगितल्या.

अल्पसंख्याकांचा जमातवाद : संजय संगवई

भारतात बहुसंख्याकांच्या जमातवादाबरोबरच अल्पसंख्याकांचा जमातवाद वाढत असून, ते एकमेकांचे परस्पर पोषण करत आहेत. दोन्ही जमातवादांचा उद्देश असुरक्षिततेची भावना निर्माण करून सत्ता प्राप्त करणे हा असतो. आपल्या व्याख्यानात संगवई यांनी भारतातील मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख जमातवादाचे विवेचन केले आहे. बहुसंख्याकांचा व अल्पसंख्याकांचा जमातवाद सवर् समाजासाठी घातक आहेच पण तो त्या त्या समाजातील लोकांसाठी जास्त धोकादायक असते, हे त्यांचे मत विचारणीय आहे.

धर्म व राजकारण : पुष्पा भावे

प्रा. पुष्पा भावे यांनी धर्माचे बदलते स्वरूप स्पष्ट करून त्यांचा राजकारणात कसा उपयोग केला जातो याचे प्रत्ययकारी विवेचन केले. त्यांच्यामते ज्यांच्या मनात काडीमात्र धर्मश्रध्दा नाही असे लोक राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी धर्माचे अवडंबर माजवतात, धर्माचे राजकारण करतात. धर्माचा विचार आपली विवेकबुध्दी शाबूत ठेवून करावा आणि त्याचा राजकारणासाठी वापर करणाऱ्यांपासून सर्वसामान्य माणसांनी सावध असावे असे मत त्यांनी व्यक्त केले.