श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

कॉम्रेड गोविंदराव पानसरे अमृतमहोत्सव समितीतर्फे प्रकाशित पुस्तके


कॉम्रेड गोविंदराव पानसरे अमृतमहोत्सव समितीतर्फे प्रकाशित पुस्तके

साम्यवादी कार्यकर्त्यांच्या योगदानाला उजाळा


कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांना कृतज्ञतापूर्वक "लाल सलाम' यासाठी केला पाहिजे, की स्वत:च्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांनी एक चांगला-कसदार साहित्यिक पायंडा पाडला. महाराष्ट्रातील साम्यवादी चळवळीतील जुन्या-जाणत्या, विस्मृतीत गेलेल्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या कार्याची, विचारांची, त्यागाची ओळख करून देणार्‍या पुस्तकांची निर्मिती करण्याचा संकल्प अमृतमहोत्सव समितीने केला आणि त्यातील ३४ पुस्तकं प्रकाशित झालीयत. इतिहास वा चरित्र- लेखनात न अडकता गेल्या ८०-९० वर्षांच्या काळात शेतमजूर, असंघटित-संघटित कामगार, गिरणी कामगार, सर्वहारा मजूर, साखर कामगार, विडी कामगार, महिला यांच्यामध्ये काम करणा-या ध्येयवादी कार्यकर्त्यांची चरित्रं, कामाच्या ओळखीतून करून देण्याचा प्रयत्न यातील काही पुस्तकांमधून प्रभावीपणे झाला आहे. महाराष्ट्रात असा प्रयोग यापूर्वी झालेला नाही.

या सर्व पुस्तकांमध्ये कार्यकर्त्यांची चरित्रं फारच स्फूर्तिदायी आणि रंजक बनलीयत. याचं कारण म्हणजे चळवळीतीलच जाणकारांनी चरित्रनायकांविषयी केलेलं लेखन. गिरणगावच्या बुरुजावरील बुलंद तोफ, अशी ओळख असलेल्या गुलाबराव गणाचार्यांविषयी चळवळीतील कार्यकर्ते प्रा. तानाजी ठोंबरे यांनी लेखन केलंय. त्यामुळे नेमकेपणा येऊन अवांतर गोष्टीला वाव उरलेला नाही. असंच चंद्रगुप्त आणि करुणा चौधरी (ले. भालचंद्र कांगो), व्ही. डी. देशपांडे (ले. गोविंद गोडबोले), विठ्ठलराव कदम (ले. राजकुमार कदम), गंगाधर चिटणीस (ले. अविनाश कदम), स. ना. भालेराव (ले. इंदुमती भालेराव), शेखकाका (ले. पुरुषोत्तम शेठ), जी. एल. आणि तारा रेड्डी (ले. प्रतिमा जोशी), सुमेरसिंह नहाटा (ले. शरद सुरवसे) यांच्या व्यक्तिचित्रांबाबत झालंय. या छोटेखानीच असलेल्या पुस्तकांतील काही प्रसंगांचे उल्लेख, वर्णनं ही कदाचित पुढे जाऊन एखाद्या लढ्याच्या इतिहासलेखनाला प्रवृत्त करतील एवढं सामर्थ्य या छोट्या छोट्या आठवणींतून प्रकट झालंय. विठ्ठलराव कदम हे बीड जिल्ह्यातील झुंजार कार्यकर्ते. पंचायत समितीने अचानक शेतीमालावर 40 पैसे "सेस' लावला, त्याविरुद्ध कॉ. कदम यांनी जे व्यापक आंदोलन उभारलं त्याची नोंद "चाळीस पैशांचं आंदोलन' अशी झाली. ऊसतोड कामगारांचं संघटन असो, डीबीकेंनी स्थापलेल्या रेल्वे कामगारांची परिषद असो की स. ना. भालेरावांनी जळगावात केलेलं आदिवासी संघटन, चंद्रगुप्त चौधरी यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत बजावलेली महत्त्वाची नामांतरवादी भूमिका असो, या छोट्या छोट्या आठवणींतून, संदर्भांतूनच ही पुस्तकं वाचताना चळवळीची व्यापकता-बहुविधता लक्षात येते. सर्वसामान्यांच्या सुखदु:खाशी एकरूप होऊन लढणार्‍या एका पिढीची ओळख या पुस्तकांमुळे अधिक घट्ट होते.

याच मालिकेत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील कम्युनिस्टांचा सहभाग (ले. मधू शेट्ये), आधुनिक शाहिरी आणि कामगार रंगभूमी (ले. रमेशचंद्र पाटकर), निझामविरोधी आंदोलन (ले. गोपाळराव कुर्तडीकर), पेटलेले दिवस (ले. विठ्ठल शेवाळे), नाविकांचे ऐतिहासिक बंड (ले. सुब्रता बॅनर्जी) ही पुस्तकं कम्युनिस्टांच्या त्या वेळच्या भूमिका समजून घ्यायला मदत करतात. आंदोलनामागची रणनीतीही त्यातून समजते. काही महत्त्वाचे तपशील ओघाओघाने येतात, तर अनेक माहिती नसणा-या गोष्टी, घटना सहजपणे येतात. वसंतराव तुळपुळे, सुदाम देशमुख, एस.एस. मिरजकर, एस.जी. पाटकर, बी.एस.घुगे, भाई चितळे-टिळेकर, कमल भागवत, शांता रानडे यांच्यावरील पुस्तकंही मनात शेकडो संदर्भ निर्माण करतात. या संदर्भांना एकत्र गुंफलं की महाराष्ट्रातील साम्यवादी चळवळीच्या इतिहासाचे टप्पेही उलगडताना दिसतात ५० ते २०० पानांपर्यंत असलेली ही पुस्तकं छोटेखानी आणि कथाकथनाच्या, आठवणी सांगण्याच्या शैलीत लिहिली गेल्यानं बहुतेक पुस्तकांना "कौटुंबिक' स्वरूप आलंय. त्यामुळे क्रांतिकारी काम करणार्‍या डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा घरगुती भावनिक कोपराही बघायला मिळतो. "माझ्या आईची गोष्ट' (ले. डॉ. रूपेश पाटकर)मध्ये या सर्व गोष्टी फार चांगल्या चितारल्या गेल्या आहेत. कार्यकर्ते आंदोलनात कसे तयार होतात याचं प्रभावी चित्रण पाटकरांच्या लेखनातून झालंय.

कॉ. पानसरे अमृत महोत्सव समितीने प्रकाशित केलेल्या पहिल्या 34 पुस्तकांत "जागतिकीकरणाची अरिष्टे' (संपादक : उत्तम कांबळे), तसेच "महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती' (संपादक : डॉ. श्रीनिवास खांदेवाले-डॉ. जे. एफ. पाटील) या चर्चात्मक पुस्तकांचा समावेश आहे. अरिष्टांमध्ये जागतिकीकरणाच्या दृष्टीतून स्त्रिया, कामगार, लोकशाही, प्रसारमाध्यमे, मध्यमवर्ग, पर्यावरण यावर वैचारिक टिपण आहेत, तर "कोरडवाहू शेती'मध्ये विदर्भ-मराठवाडा-खानदेशातील शेतीसमस्यांची मांडणी स्पष्टपणे करण्यात आलीय. संदर्भग्रंथांचं मूल्य या दोन्ही खंडांना त्यातील वेधक मांडणीनं प्राप्त झालंय. कॉ. पानसरे यांनी पुढाकार घेऊन ३४ पुस्तकांच्या संचाची अमृतमहोत्सवी समितीमार्फत निर्मिती करून एक आदर्श वस्तुपाठच वाचक चळवळीपुढे निर्माण केलाय.