श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

वर्ष ५ वे नाशिक (२०१४)


पाचवे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, नाशिक (४, ५ जानेवारी, २०१४) ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे (संमेलनाध्यक्ष)

मित्रांनो,

जगाचा इतिहास आपल्याला असे सांगतो, की मानवी समाजविकासक्रमात माणसांनी निर्माण केलेल्या सर्वसामान्यांच्या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या वेळी सामान्य जनता आपल्या मातृभाषेला समृद्ध आणि प्रतिष्ठित करीत असते तेथून पुढेच समाज विकासाला परिवर्तनाच्या माध्यमातून सुरवात होते. शोषक आणि शासकांच्या दास्यातून मुक्त होण्याची पूर्वअट ही जनभाषांना प्रतिष्ठा प्राप्त होण्याची असते. शोषक आणि शासकांची ज्ञानावरील मक्तेदारी आणि त्यांनी सामान्य जनतेवर लादलेल्या सामाजिक आणि राजकीय वर्चस्वाविरुद्ध पहिली झुंज भाषाच देत असते.
कालौघात जेव्हा शोषक आणि शासकांची भाषा जनतेशी संवाद करण्याचे जिवंत माध्यम उरत नाही तेव्हा ते सत्ता आणि अधिकार सुरक्षित ठेवण्याचे एक यांत्रिक साधन बनते. या यांत्रिक साधनामुळेच समाज जेव्हा स्थितिशील आणि दुबळा बनत असतो, त्या वेळी समाजसुधारक आणि क्रांतिकारी पुढे येतात आणि ते जनतेची भाषा बोलू लागतात. त्या अर्थाने सिद्धार्थ गौतम बुद्ध हे भारतातील पहले क्रांतिकारक आहेत,
ज्यांनी पालीसारखी जनभाषा ज्ञानविज्ञानाची भाषा बनविली. आपल्या शिष्यांनी प्रत्येक विभागात तेथील जनभाषेतच बोलावे, असा संदेश दिला, त्यामुळे संस्कृत भाषेच्या तुरुंगातून सामान्य जनता मुक्त झाली.
स्वतःच्या मुक्तीचा मार्ग स्वतःच शोधू लागली. युरोपातसुद्धा असेच घडले. मूळ बायबल अॅरेबिक भाषेत लिहिले गेले होते. या ग्रंथाचे अनुवाद जोपर्यंत ग्रीक आणि लॅटिन भाषेत होते, तोपर्यंत ख्रिस्ती पुरोहितवर्ग म्हणेल ती पूर्वदिशा होती. परंतु इंग्लंडमध्ये विक्लिफ (1320-1384) यांनी बायबलचे पहिले भाषांतर केले
आणि तो ग्रंथ जगातील सर्व समूहांच्या लोकभाषेत पोचण्याचा मार्ग खुला झाला. त्यानंतर दीडशे वर्षांनी जर्मनीत विटेनवर्ग येथे मार्टिन ल्यूथरने पोपच्या धर्मसंस्थेला आव्हान दिले. स्वित्झर्लंडमध्ये झ्विंगली या धर्मसुधारकाने ल्यूथरला साथ दिली. जीनिव्हात केल्बिन बंड करून उभे राहिले. सोळाव्या आणि सतराव्या शतकात नेदरलँड, फ्रान्स आणि स्कॉटलंडमध्ये सुधारणांच्या चळवळींनी वेग घेतला. त्याच पार्श्वभूमीवर युरोपातील पुनरुज्जीवन आणि प्रबोधनाची चळवळ उभी राहिली आणि साम्राज्यशाहीच्या माध्यमातून तिने संपूर्ण जग आपल्या कवेत घेतले. तेथून पुढेच संपूर्ण जग आधुनिकतेकडे वाटचाल करण्यास स्वतंत्र झाले.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे (संमेलनाध्यक्ष) यांचे संपूर्ण भाषण साठी येथे क्लिक करा