श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

वर्ष ५ वे नाशिक (२०१४)


५ वे कॉ.अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, नाशिक (४,५ जानेवारी,२०१४)

श्रमिक प्रतिष्ठान (कोल्हापूर) आणि कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने ४ व ५ जानेवारी, २०१४ रोजी नाशिक येथील बाबुराव बागूल साहित्य नगरी अर्थात महाकवी कालिदास कलामंदिर येथे ५ वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.
४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता शहरातील अण्णा भाऊ साठे पुतळा येथे डॉ. हेमलता पाटील यांच्या हस्ते व वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रबोधन फेरीला प्रारंभ करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून ही फेरी बाबूराव बागूल साहित्य नगरीत आली. यामध्ये राज्यभरातून आलेले प्रतिनिधी आणि स्थानिक शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड विचारमंचावर सुप्रसिद्ध कवी लहू कानडे यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, स्वागताध्यक्षा डॉ. मनीषा जगताप, नामदार छगन भुजबळ, पालकमंत्री ॲड. यतीन वाघ, महापौर विनायकदादा पाटील, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे, कवी सतीश काळसेकर, डॉ. हेमलता पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी संपादित केलेल्या ‘कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन : पाच अध्यक्षीय भाषणे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, की...

जागतिकीकरणाच्या आजच्या काळात जनभाषा लुप्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संपूर्ण जगभर इंग्रजी भाषा ही ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वाहक नाडी बनली आहे. कदाचित तिचा उपयोग शोषक आणि शासक वर्ग अतिशय कुशलतेने जनतेच्या चळवळी मोडून काढण्यासाठी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु आज आपल्याला इंग्रजीला विरोध करता येणार नाही. ज्यांना मराठीच्या भवितव्याची उरबडवी चिंता वाटते त्यांनी इंग्रजीच्या स्पर्धेत उतरून तिला आत्मसात केले पाहिजे. त्याचप्रमाणे ज्ञान-विज्ञान, कला आणि तत्त्वज्ञानात सर्जनशील बनून मराठीत लेखन करून तिलाही इंग्रजीचा समकक्ष दर्जा मिळेल इतकी तिला समृद्ध केली पाहिजे. उद्या येणार्या गुलामगिरीला प्रतिकार करणारे मराठी किंवा इतर जनभाषा हेच एकमेव हत्यार पुरोगामी चळवळींच्या हातात असेल म्हणून तिला जिवंत ठेवणे आणि समृद्ध करणे ही गोष्ट पुरोगाम्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवर अगत्याने असली पाहिजे.

अण्णा भाऊंचा मराठमोळा मार्क्सवाद

मार्क्सवादाचे, कम्युनिस्टचे नाव काढताच भारतातील भांडवलदार वर्ग आणि हिंदुत्ववादी जातीग्रस्त मन थरथर कापू लागते. संपूर्ण जगातल्या भांडवलशाहीचा एकमेव शत्रू मार्क्सवादी, कम्युनिस्ट आहे. तर इथल्या हिंदुत्ववाद्यांचे तीन शत्रू गोळवलकर गुरुजींनी त्यांच्या ‘विचारधन‘ या लिखाणात स्पष्ट केले आहेत. त्यांचाही एक नंबरचा शत्रू कम्युनिस्ट आहे, तर दोन आणि तीन नंबरवर मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत. ज्यांना अण्णा भाऊंना नीट समजून घ्यायचे असेल, त्यांनी पहिल्यांदा मार्क्सवाद व्यवस्थित अभ्यासून समजून घेतला पाहिजे.
अण्णा भाऊ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक होते. जगातील समाजवादी देशातील अनेक भाषांत त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले आहे. याचा अर्थ त्यांच्या साहित्याला काही मर्यादाच नव्हत्या, असा होत नाही. कॉ. श्री. अ. डांगे यांनी त्यासंबंधी अण्णा भाऊंच्या ‘शाहीर’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्या विस्ताराने स्पष्ट केल्या आहेत. अण्णा भाऊंना मातंग समाज ज्या प्रकारे जातीत अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे तो अण्णा भाऊंच्या कर्तृत्वाला सीमित करणारा आहे. त्याचप्रमाणे, अण्णा भाऊंनी ‘फकिरा‘ बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आणि त्यांनी ‘बुद्धांची शपथ‘ ही कथा लिहिली म्हणून ते आंबेडकरवादी आहेत, हा बौद्धांचा दावा ही निखालस मतलबी आहे. अण्णा भाऊ हे राजकीयदृष्ट्या मार्क्सवादी, कॉम्रेड होते, कलेच्या क्षेत्रातील ते एक महान लोकशाहीर होते आणि वाङ्मयाच्या क्षेत्रात ते एक क्रांतिकारी लेखक होते, हीच त्यांची प्रतिमा आहे आणि ती पुसली जाऊ नये असे मनापासून वाटते. त्यांच्या या प्रतिमेशी सहमत होत, तर कधी तिच्याकडे चिकित्सकपणे पाहूनही अण्णा भाऊंशी नाते जोडता येऊ शकते, तसे ते जोडले जावे.

परिसंवाद व कवि संमेलन

उद्घाटन सत्रानंतर ‘अण्णा भाऊ साठे यांचे क्रांतिकारी जीवन’ या विषयावर उत्तम कांबळे यांचे व्याख्यान झाले. यानंतर प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘अण्णा भाऊंच्या साहित्यातील बंडखोर नायिका’ या विषयावरील परिसंवादात प्रा. तानाजी ठोंबरे, कॉ. मुक्ता मनोहर, बी. जी. वाघ, प्रा. शरद गायकवाड यांनी सहभाग घेतला. सायंकाळी कवी सतीश काळसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
५ जानेवारी रोजी उद्धव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अण्णा भाऊंच्या साहित्यातील मार्क्स आणि आंबेडकर’ या विषयावरील परिसंवादात डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रा. प्रतिमा परदेशी, प्राचार्य डॉ. आनंद मेणसे, प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी सहभाग घेतला. ‘साहित्यातील प्रागतिक विचार‘ या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते हिंदी कवी अरूण कमल यांचे व्याख्यान झाले. यानंतर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. गोपाळ गुरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘अण्णा भाऊंची क्रांतिप्रवण आणि निसर्गसन्मुख भाषा’ या विषयावरील परिसंवादात प्रा. रणधीर शिंदे, प्रा. मनोहर जाधव, प्राचार्य दिलीप धोंडगे यांनी सहभाग घेतला. संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, कॉ. गोविंद पानसरे, कवी सतीश काळसेकर, प्रा. राजन गवस, ॲड. एकनाथ आव्हाड, डॉ. मनीषा जगताप आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप करण्यात आला.