श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

वर्ष ४ रे नागपूर(2012)


४ थे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, नागपूर (२५, २६ ऑगस्ट, २०१२) ॲड. एकनाथराव आव्हाड, प्रगतशील चळवळीतील ख्यातनाम कार्यकर्ते व लेखक

संमेलनाध्यक्ष ॲड. एकनाथराव आव्हाड म्हणाले, की...

चौथ्या कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या भूमिकेतून आपणाशी संवाद साधताना मनात संमिश्र भावना आहेत. मुख्यतः अण्णा भाऊ आणि त्यांच्या अनुषंगानं समकालीन चळवळ असं बोलण्याचं मनात आहे. मी रांगडा माणूस आहे. मनमोकळं बोलेन.
मी साहित्यिक नाही. समीक्षक नाही. समज आली तेव्हापासून चळवळीतच जगलो, वाढलो. फुले-शाहू-आंबेडकर आणि मार्क्सवादाची सांगड घालून रस्त्यावरील संघर्षात माझी जडणघडण झाली आहे. चळवळीशी जोडलेल्या या नात्यातूनच या ठिकाणी मी बोलणार आहे.
हे संमेलन नागपूरमध्ये होत आहे. दलित शोषितांच्या चळवळीत नागपूरला ऐतिहासिक महत्त्व आहे. नागपूर ही बौद्ध नाग समुदायाची भूमी. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तनासाठी नागपूरची निवड केली. 1956 साली माझं वय चार-पाच वर्षांचं असावं. अर्थातच तेव्हा काही कळत नव्हतं. पण माझे वडील मात्र आसपासच्या खेड्यांवर महारांनी म्हारक्या सोडल्याचं आणि त्यामुळे वातावरण तापल्याचं सांगत. आंबेडकरी विचारांचे संस्कार तेव्हापासून माझ्या मनावर होत गेले. पुढे विद्यार्थिदशेत बौद्ध विचारधारेचाही अभ्यास झाला. 1979 साली माझ्या दुसर्या अपत्याचं नाव मी ‘मिलिंद’ असं ठेवलं. तेव्हाच मी मनानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धम्माचा पाईक झालो होतो. नंतरच्या काळात मी अनेक मांग आणि भटक्या विमुक्त जमातींसोबत औपचारिकपणे बौद्ध धम्म स्वीकारला.
एप्रिल आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत विदर्भ-मराठवाड्यातल्या माझ्या दौर्यांमध्ये अचानक वाढ होते. कारण काय? तर एप्रिलमधली आंबेडकर जयंती आणि ऑगस्टमधली अण्णा भाऊंची जयंती. या दोन निमित्तांनी खेड्यातल्या दलित वस्त्यांवरचा उत्साह आणि जोश मी दर वर्षी अनुभवतो. या भाषणाच्या निमित्तानं चळवळीतील एक अनुभव इथे नोंदवतो. थोडं विषयांतर वाटेल. पण मला जो मुद्दा ठसवायचा आहे, त्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे.
काही लोकांना या जयंत्या साजर्या होणं निष्फळ वाटतं पण या जयंत्यांमधूनच दलित वस्ती आपली अस्मिता, स्वाभिमान जपत असते. 1990 सालची गोष्ट. आमच्या बीड जिल्ह्यातील सादोळा हे गाव. या गावातील सवर्ण खूप जात-धर्माभिमानी वृत्तीचे होते. गावात लग्नाच्या वर्हाडासोबत वाड्यात आलेली बाई वाड्याबाहेर पडायची ती मेल्यानंतर तिरडीवरच! असली या गावची कर्मठ मानसिकता.
कुणीतरी खाकरून थुंकल्यासारखी या गावातली दलित वस्ती गावाच्या एका टोकाला होती. सादोळ्याचे दलित गावाला घाबरून जयंती साजरी करत नव्हते. जयंतीच्या दिवशी सादोळ्यातले दलित दुसर्या गावात जायचे तेव्हा तिथली दलित वस्ती यांना हिणवायची. ‘तुम्हाला तुमच्या गावात जयंती साजरी करायची हिंमत नाही’ म्हणून टोकायची. सादोळ्यातले दलित खाल मानेनं सगळं ऐकून घ्यायचे. एकदा कधीतरी सादोळ्यातल्या दलित वस्तीनं जयंती साजरी करायचा प्रयत्न केला होता. पण गावकर्यांनी आंबेडकरांचा फोटो फोडला होता. या कर्मठ मानसिकतेला वठणीवर आणायचं बर्याच दिवसांपासून आम्ही ठरवत होतो. पण संधी मिळत नव्हती. गावातल्या दलित वस्तीचीही साथ मिळत नव्हती.
ॲड. एकनाथराव आव्हाड, प्रगतशील चळवळीतील ख्यातनाम कार्यकर्ते व लेखक यांचे संपूर्ण भाषण साठी येथे क्लिक करा