श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

वर्ष ४ रे नागपूर(2012)


४ थे कॉ.अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन,नागपूर (२५,२६ ऑगस्ट,२०१२)

साहित्य संमेलनांच्या इतिहासात वेगळी प्रतिष्ठा लाभलेले ४ थे राज्यव्यापी कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन २५ व २६ ऑगस्ट, २०१२ रोजी विदर्भात नागपूर येथील नारायण सुर्वे साहित्य परिसरात उत्साहात संपन्न झाले. २५ ऑगस्ट रोजी नागपूर येथील अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून अभिवादन यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही अभिवादन यात्रा दीक्षाभूमीमर्गे संमेलन स्थळी आली. याठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड ए. बी. बर्धन यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्ष तथा प्रगतीशील चळवळीतील ख्यातनाम कार्यकर्ते-लेखक ॲड. एकनाथराव आव्हाड, स्वागताध्यक्ष तथा नागपूरचे पालकमंत्री ॲड. शिवाजीराव मोघे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे, महापौर अनिल सोले, साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रा. राजन गवस, कवी सतीश काळसेकर, संयोजक नेताजी राजगडकर या मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले.संमेलनाध्यक्ष ॲड. एकनाथराव आव्हाड म्हणाले, की...

अण्णाभाऊंना साहित्यसम्राट असे एक बिरूद लावले जाते. भाराभार पुस्तके छापून साहित्यिक म्हणून मिरवणारे अनेक जण आहे. अण्णाभाऊ असे छापाऊ व विकाऊ साहित्यिक नव्हते. त्यांच्या लेखनाला वैचारिक बैठक होती. अण्णाभाऊंनी माणसाला प्रतिष्ठा मिळवून दिली असून त्यांच्या साहित्याचा आग्रह म्हणजे मानवी मूल्यांचा आग्रह होय. शोषित वंचितांशी नाते सांगणारे अण्णाभाऊ लोकांपर्यत पोहचले पाहिजे. समाजाला न्याय देणारी भूमिका अण्णाभाऊंच्या साहित्यात आहे.
अण्णाभाऊंनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेने हीन ठरवलेल्या जमातींना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परिवर्तन हेच त्यांच्या लेखनाचे केंद्र होते आणि हे परिवर्तन वर्षानुवर्षे अपमानित जिणे जगणार्‍यांना सन्मान मिळवून देण्यास हातभार लावेल. तसेच गावपातळीवर संघर्षाची परिवर्तनाची प्रेरणा देईल, अशा साहित्याची आज गरज आहे. पण आज उलट घडताना दिसते. प्रबोधनाऐवजी समाजाला जातीच्या विळख्यातच ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दलित, बहुजनविमुक्त समाज आज नव्या अस्मितेसाठी झगडताना दिसतो. अण्णाभाऊंनी श्रेष्ठ कथा लिहिल्या. त्यात परिवर्तनाचा विचार सामावलेला असून क्रांती घडवणारे नवे नवे नायक उभे करण्याची गरज आहे, तसेच आज संघर्षाला पर्याय नसून आता वळू नका.

संमेलनाचे उद्घाटक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड ए. बी. बर्धन म्हणाले, की…

प्रत्येक समाजाला आपल्या महापुरुषांचा अभिमान वाटतो ही वास्तविकता असून अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या साहित्यिकाला जातिपातीत अडकवून समाजाचे नुकसान करू नका. अण्णाभाऊ साठे यांनी १९३६ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व मिळवले. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नव्हे तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे, असे सांगणार्‍या अण्णाभाऊंचे अप्रकाशित साहित्य शोधा, ते प्रकाशित करा, अण्णाभाऊंचा विचार समाजाच्या तळागाळात पोहचविण्याची गरज असून तोच अण्णाभाऊंचा खरा सन्मान असेल.
आपल्या समाजात वर्गविभाजनासोबतच जाती विभाजन मोठ्या प्रमाणात असून इथल्या श्रमिकांना प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढायला अण्णाभाऊंनी शिकवले. अण्णाभाऊंच्या स्वप्नातला वर्गविहीन व जातपातविहीन समाज निर्माण झाल्याशिवाय बदलांची अपेक्षा करता येणार नाही.

परिसंवाद व कवि संमेलन

उद्घाटनानंतर साहित्यिक डॉ. बाबूराव गुरव (कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी साहित्यातील अण्णा भाऊ साठे यांची उपेक्षा’ या विषयावरील झीमनजी व केशरबाई सुकर स्मृती परिसंवादात डॉ. शरद गायकवाड (कोल्हापूर), डॉ. सतीश बडवे (औंरगबाद), डॉ. अश्रू जाधव (मांढळ), प्रा. अनिल नितनवरे (भंडारा), डॉ. शैलेंद्र लेंडे (नागपूर) यांनी सहभाग घेतला.
पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली ‘भारतीय समाजक्रांतीचे साहित्य व साहित्याची क्रांतीकारकता’ या विषयावरील कॉ. दि. वा. फडणवीस स्मृती परिसंवादात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसरचिटणीस व विचारवंत डॉ. भालचंद्र कानगो (औरंगाबाद),. श्रीपाल सबनीस (पुणे), प्रा. डॉ. अशोक पळवेकर (अमरावती), बालाजी थोटवे (नांदेड), प्रा. मिलींद कसबे (नारायणगाव), प्रा. डॉ. महेंद्र कदम, प्रा. राजेंद्र मुंढे (वर्धा), डॉ. अनंत सूर (मुकुटबन), प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे (नागपूर) यांनी सहभाग घेतला.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. तर त्यानंतर लहू कानडे (अहमदनगर) यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या विविध कानाकोपर्यातून आलेल्या कवी सहभागाने पार पडलेले कवि संमेलन चांगलेच रंगले.
संमेलनाच्या दुसऱ्यादिवशी म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी पहिल्याच सत्रात क्रांतीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर डॉ. ज्योती लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील नायिका’ या विषयावरील कृष्णाजी गुलजार बेहाडे स्मृती परिसंवादात प्रा. डॉ. सुशीला तेलतुंबडे (नागपूर), डॉ. इसादास भडके (चंद्रपूर), प्रा. तानाजी ठोंबरे (सोलापूर), डॉ. प्रमोद गारोडे (परतवाडा), प्रा. डॉ. बी. टी. अंभोरे (अमरावती), प्रतिभा शिंदे (नंदूरबार), प्रा. अजय देशपांडे (वणी) यांनी सहभाग घेतला.
दैनिक भास्करचे संपादक प्रकाश दुबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘साहित्य, नाटक, सिनेमा व प्रसारमाध्यमे यातील जनआंदोलनांचे प्रतिबिंब’ या विषयावरील परिसंवादात डॉ. प्रकाश खरात (नागपूर), डॉ. जयदेव डोळे (औरंगाबाद), साहीर संभाजी भगत (मुंबई), प्रा. डॉ. सतीश पावडे (वर्धा), डॉ. रणधीर शिंदे (कोल्हापूर), सुभाष चांदूरकर (नागपूर), नरेंद्र लांजेवार (बुलढाणा) यांनी सहभाग घेतला. यानंतर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा. डॉ. यशवंत मनोहर, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, बाळकृष्ण रेणके, सतीश काळसेकर, डॉ. वि. स. जोग, लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप करण्यात आला.