श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

वर्ष २ रे अहमदनगर (२०१०)


२ रे राज्यस्तरीय कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, अहमदनगर (२१, २२ मे २०१०) सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस (संमेलनाध्यक्ष)

व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींनो,

या संमेलनाचे संकल्पक, ज्यांच्यामुळे हा अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा जागर सुरू झाला ते आदरणीय अण्णा ऊर्फ कॉ. गोविंदराव पानसरे पहिल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाची भूमिका मांडताना म्हणाले होते, की हे व्यासपीठ खुले विचारपीठ आहे. या ठिकाणी खुलेपणाने विचार मांडणार्या सर्वांचे स्वागत आहे. हा खुलेपणा दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे. एका लेखकाच्या नावाने साहित्यजागर ही महत्त्वाची घटना आहे. त्या लेखकाचे स्मरण, पुनर्मूल्यांकन, त्यांच्या वाङ्मयीन भूमिकेचे आजच्या संदर्भात आकलन तर या विचारपीठावर अपेक्षित आहेच, त्याबरोबरच त्या लेखकाने आपल्या वाङ्मयकृतीतून, विचारधारेतून, जीवनविषयक दृष्टिकोनातून ज्या समाजाचे स्वप्न पाहिले असेल, त्या संदर्भातील वास्तव तपासणे, आपण कुठे आहोत? आपल्या दिशा कोणत्या? आपले नवे प्रश्न कोणते? या सार्यांचा समग्र विचार व्हावा. यातून आकलनाच्या, विचारांच्या नव्या दिशा, नवे ऊर्जास्रोत निर्माण व्हावेत, अशीही अपेक्षा हे विचारपीठ बाळगते. हे मला महत्त्वाचे वाटते.
माझ्या लेखनाच्या आस्थेचा केंद्र सर्वसामान्य माणूस हाच आहे. ज्या शेतीव्यवस्थेत, ज्या गावगाड्यात मी वाढलो, तेथील अस्वस्थ वर्तमानाने, तेथील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा यांनी मला लिहिते केले. माझ्या घडणीच्या काळात ज्या पुरोगामी चळवळी माझ्या अवतीभवती कार्यरत होत्या, नव्या समाजाचे स्वप्न पाहत होत्या, त्यांच्या सावलीत मला वावरता आले. यामुळे वास्तवाची दाहकता अधिक तीव्रतेने जाणवत गेली. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे या सार्यांच्या प्रगल्भ जीवन विचारप्रणालीने माझ्या पिढीतील अनेकांची जीवनदृष्टी विकसित होत गेली. या पूर्वसुरींच्या उत्तुंग कामगिरीचा परिपाक म्हणजे महाराष्ट्रभर बहुजन समाजातील अनेक तरुण नव्या विचारांनी, नव्या जीवनदृष्टीने नवसमाजरचनेचे स्वप्न पाहू लागले. त्यांना आत्मभान प्राप्त होऊ लागले. अशा ध्येयवादी माणसांनी माझ्या घडणीच्या काळात मला समृद्ध केले.
मी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा एक चाहता आहे. मला अण्णा भाऊंचे साहित्य आवडते. आजही जवळचे वाटते. याचे कारण काय? अण्णा भाऊंची छक्कड आजही जशीच्या तशी माझ्या ओठावर येते, मनात रेंगाळते, आपल्याला असे काही लिहिता यावे अशी आकांक्षा उत्पन्न होते. याचे मूळ कोठे आहे? फकिरा वाचताना ही कलाकृती आजही तितकीच ताजी, समकालीन वाटते. या कादंबरीचे हे कालसापेक्षकत्व कशात आहे? असे मनात येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधताना असे जाणवते, की अण्णा भाऊ माझ्या भोवतालविषयी, माझ्या माणसांविषयी, त्यांच्या जगण्याविषयी, जगण्यातील प्रश्नांविषयी कमालीचे सजग होते. सामान्य माणसाच्या जगण्यातील पेच त्यांना नेमकेपणाने पकडता आले. त्या माणसाच्या जगण्यातील प्रश्न, पेच, संघर्ष समजून घेण्यासाठी, समग्र आकलन मांडण्यासाठी ठोस विचारधारेचा आणि गंभीर जीवनविषयक दृष्टिकोनाचा त्यांनी स्वीकार केलेला होता. त्यामुळेच ते म्हणू शकलेही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेलली आहे. ‘नाही हेऽऽ‘ वर्गाच्या जगण्याशी तन्मय झालेले म्हणण्यापेक्षा, सामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणून ते अखंड लिहीत राहिले. त्यांचे साहित्य वर्तमानाला तीव्र प्रतिक्रिया देणारे, भोवतालचे काचदाब असह्य झाल्यानंतर त्या सार्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देणारे साहित्य आहे. माणूस हा त्यांच्या आस्थेचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या आस्थेचा परीज्ञ वैश्विक आहे. त्यामुळेच ते जशी ‘मुंबईची लावणी‘ लिहितात तसाच ‘स्टॅलिनग्राडचा पोवाडा‘ लिहितात. समकालीन प्रश्नांना थेट भिडताना त्यांची लेखणी कोणते रूप धारण करते, हे पाहण्यासाठी त्यांचा ‘पंजाब-दिल्लीचा दंगा‘, ‘बंगालची हाक‘ हे पोवाडे मुळातून वाचायला हवेत.

प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस (संमेलनाध्यक्ष) यांचे संपूर्ण भाषण साठी येथे क्लिक करा