श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

वर्ष २ रे अहमदनगर (२०१०)


२ रे राज्यस्तरीय कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, अहमदनगर (२१, २२ मे २०१०) सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस (संमेलनाध्यक्ष)

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन २१ व २२ मे, २०१० रोजी अहमदनगर येथील कॉ. भास्करराव जाधव साहित्यनगरी अर्थात सहकार सभागृहात उत्साहात संपन्न झाले. शुक्रवार दि. २१ रोजी सकाळी ८ वाजता नगरमधील लालटाकी येथील कॉ. अण्णा भाऊ साठे स्मारक येथून अभिवादन यात्रेस प्रारंभ झाला. ही यात्रा शहरातील प्रुमख मार्गावरून फिरून कॉ. भास्करराव जाधव साहित्यनगरीत आली.

याठिकाणी सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक उत्तम कांबळे यांच्या हस्ते कष्टकरी, श्रमिक वर्गाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लाल, निळ्या, पांढऱ्या, हिरव्या रंगाच्या कापडाची एकत्रित गाठ बांधून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजन गवस, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंदराव पानसरे, स्वागताध्यक्ष ॲड. रावसाहेब शिंदे, संयोजन समितीचे अध्यक्ष अरूण कडू पाटील, साहित्य सल्लागार लहू कानडे, प्राचार्य विद्याधर आटी व खासेराव शितोळे, ज्येष्ठ नेते भाई वैद्य, आमदार डॉ. सुधीर तांबे, नाथामास्तर घोडेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संमेलनाध्यक्ष डॉ. राजन गवस म्हणाले, की...


'जागतिकीकरणाच्या स्पर्धेत "भरपूर असणारे' व "काहीच नसणारे' असे दोनच वर्ग उरणार आहेत. मध्यमवर्ग लयाला जाण्यास सुरवात झाली असून, लवकरच हा वर्ग "काहीच नसणारे'मध्ये समाविष्ट होणार आहे. अशा पार्श्‍वभूमीवर शिक्षण घेतल्यानंतर बहुजनांचं प्रस्थापित होत जाणं दुर्दैवी आहे. आपण कोण आहोत, कोठून आलोत, आपला कुलवृत्तांत काय, याचा शोध बहुजनांच्या अस्मितेसाठी आवश्‍यक आहे. या अस्मितेच्या निर्मितीचे आव्हान नव्या पिढीला पेलावे लागणार आहे. तरच आपल्याला मुळापासून उपटू पाहणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे उभे ठाकणे शक्‍य होणार आहे.

90 टक्के शिक्षक व शिक्षण संस्था बहुजनांच्या असतानाही अभ्यासक्रमाच्या राजकारणात सजग घुसखोरी करता न आल्याने बहुजनांना अस्मिता निर्माण करता आलेली नाही. वाचकवर्ग तयार करण्याच्या प्रक्रियेतील बालसाहित्याकडेही बहुजनांनी दुर्लक्ष केले. आता एकीकडे विकत शिक्षण घेणाऱ्यांचा वर्ग वाढत असून, दुसरीकडे फुकटचे शिक्षण बंद केले जात आहे. अशा अवस्थेत स्वभाषेविषयीचे प्रेम व अभिमान निर्माण करण्याची गरज असून, त्यासाठी आधी "स्वअस्मिता' निर्मितीचे आव्हान पेलावे लागेल.

परिसंवाद व कवि संमेलन


या संमेलनात एकूण चार परिसंवाद झाले. त्यात "उपरा'कार लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली "परिवर्तनाच्या चळवळींना जागतिकीकरणाचे आव्हान', प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या अध्यक्षतेखाली "जातिअंत, वर्गअंत आणि अण्णा भाऊंचे साहित्य', न्या. पी. बी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली "राज्यघटनेतील परिवर्तनाची मूल्ये प्रत्यक्षात आली आहेत काय?' आणि प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखालील "दलित साहित्य चळवळ ः आजचे वास्तव' या विषयावरील परिसंवादात मान्यवरांनी सहभाग घेतला. याशिवाय प्रा. अविनाश डोळस यांच्या अध्यक्षतेखाली "सत्यशोधकी जलसा, आंबेडकरी जलसा, अण्णा भाऊंचे कलापथक आणि आजचे समाज प्रबोधन' या विषयावर परिचर्चा झाली. प्रा. डॉ. रुस्तम अचलखांब, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे व डॉ. गंगाधर अहिरे यांनी लोककलेविषयी मार्गदर्शन केले. तसेच जवळपास 75 कवींचा सहभाग असलेल्या परिवर्तनवादी चळवळीचे कविसंमेलनही उत्साहात पार पडले. या संमेलनात दलित-शोषितांच्या नियतकालिकांच्या संपादकांचा तसेच काही कलावंतांचा सत्कारही करण्यात आला. संमेलनाच्या दोन दिवसांत नवआंबेडकरी जलसा, अण्णा भाऊंची गाणी, लोककवी वामनदादांची गाणी आणि एकपात्री "फकिरा' अशा विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला.