श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

वर्ष ६ वे सावंतवाडी (२०१५)


६ वे राज्यस्तरीय कॉ.अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन,सावंतवाडी (१७,१८ जानेवारी २०१५)

श्रमिक, कष्टकरी व तळागाळातल्या अठरापगड जातींची वेदना आपल्या साहित्यातून समाजासमोर मांडणार्या कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा जागर १७ जानेवारीपासून सावंतवाडी येथे होणार आहे. कोल्हापूर येथील श्रमिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आणि सावंतवाडीतील विधिव संस्था-संघटनांच्या सहकार्याने सावंतवाडी येथील सत्यशोधक कृष्णराव अर्जुन केळुसकर साहित्य नगरी अर्थात नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात १७ व १८ जानेवारी रोजी ६ वे राज्यस्तरीय कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले असून, यामध्ये महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक व गोवा राज्यातील नामवंत साहित्यिक व चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
शनिवार दिनाकं १७ रोजी संमेलनाला प्रारंभ होणार असून, सकाळी 8.30 वाजता ग्रंथदिंडी व त्यानंतर हरिहर आठलेकर यांच्या हस्ते कविवर्य डॉ. वसंत सावंत ग्रंथदालनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यानंतर शाहीर सदाशिव निकम, शाहीर शीतल साठे व सहकारी चळवळीची गाणी सादर करणार आहेत. सकाळी 9.30 वाजता ज्येष्ठ साहित्यिक आणि वंचितांच्या चळवळीतील कार्यकर्ते डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, संमेलनाध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी सतीश काळसेकर आहेत. याप्रसंगी स्वागताध्यक्ष तथा सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे, विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, साहित्यिक डॉ. राजन गवस, दैनिक तरूण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकूर, ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार जयानंद मठकर, प्रा. आनंद मेणसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे सत्कार व स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे.

परिसंवाद

यानंतर 11 ते दुपारी 2 या वेळेत डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारमंचावर ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची प्रस्तुतता व समकालीन साहित्याच्या दिशा’ या विषयावर डॉ. माया पंडित (हैदराबाद) यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून, यामध्ये डॉ. रणधीर शिंदे (कोल्हापूर), प्रा. नितीन रिंढे (मुंबई), डॉ. आसाराम लोमटे (परभणी), प्रा. उदय रोटे (उल्हासनगर), डॉ. सुनील भिसे (वेंगुर्ले) सहभागी होणार आहेत.
दुपारी 3 ते 5 या वेळेत ‘सांस्कृतिक आक्रमकांची सद्दी वाढत चालली आहे काय?’ या विषयावर साहित्यिक राजा शिरगुप्पे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या परिसंवादात दैनिक गोवादूतचे संपादक सचिन परब (गोवा), मुक्ता दाभोळकर (दापोली), श्रीकांत देशमुख (नांदेड), गणेश विसपुते (पुणे), डॉ. शिवाजीराव जवळगेकर (लातूर) सहभागी होणार आहेत.

शाहिरी जलसा व कवि संमेलन

सायंकाळी 5.30 वाजता होणार्या शाहिरी जलशात शाहीर सदाशिव निकम व शाहीर शीतल साठे अण्णाभाऊंची गीते सादर करणार आहेत. सायंकाळी 6.30 वातजा कविवर्य नामदेव ढसाळ काव्यमंचावर प्रफुल्ल शिलेदार (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या कवी संमेलनात आनंद विंगकर, नीलकंठ कदम, दिलीप पांढरपट्टे, आ. सो. शेवरे, वर्जेश सोलंकी, अनिल धाकू कांबळी, गणेश वसईकर, फेलिक्स डिसोझा, रफिक सूरज, अजय कांडर, नामदेव गवळी, शोभा नाईक, अनुजा जोशी, बालाजी सुतार, संध्या तांबे, लीलाधर घाडी, उत्तम पवार, अरूण नाईक, सफर अली इसफ, मोहन कुंभार, सुनील कांबळे, अनिल फराकटे, विठ्ठल कदम, महेश लीला पंडित, मधुकर मातोंडकर, प्रा. जयप्रभू कांबळे, शरयु आसोलकर, अनिल सरमळकर, कल्पना बांदेकर, हर्षवर्धिनी, कल्पना मलाय, योजना यादव, दशरथ शिंदे आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.

रविवार दिनांक 18 जानेवारीचे कायर्क्रम

रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. अशोक चौसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या ‘राजकारण व समाजकारणाच्या कक्षा संकुचित होत चालल्या आहेत काय?’ या विषयावरील परिसंवादात माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, प्राचार्य आनंद मेणसे (बेळगाव), किशोर बेडकीहाळ (सातारा), कपिल पाटील (मुंबई), वैशाली पाटील (रायगड), रमेश गावस (गोवा) सहभागी होणार आहेत. त्यानंतर 12.30 वाजता वित्त व ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष सतीश काळसेकर, गोविंदराव पानसरे, डॉ. राजन गावस, जयप्रकाश सावंत यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे.
या संमेलनात साहित्यप्रेमी, कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, ॲड. संदीप निंबाळकर, डॉ. गोविंद नाजरेकर व हरिहर वाटवे यांनी केले आहे.