श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

वर्ष १ ले कोल्हापूर (२००८)


१ ले राज्यव्यापी कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, कोल्हापूर. (दि. १०, ११ मे, २००८)


कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय योगदानाची दखल सर्वांना योग्यप्रकारे व्हावी, तसेच त्यांच्या साहित्याचा जागर संमेलनाच्या माध्यमातून मांडावा या हेतूने महाराष्ट्रातील पहिले राज्यव्यापी कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन १० व ११ मे, २००८ रोजी कोल्हापूरात झाले. ज्येष्ठ साहित्यिक व कार्यकर्ते अर्जुन डांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनासाठी राज्यभरातून अण्णा भाऊंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या कायर्कर्त्यांनी आणि साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे म्हणाले, की…

अण्णा भाऊंनी वेळोवेळी जी साहित्यविषयक भूमिका जाहीर केली आहे, तिचा केंद्रबिंदू हा सर्वहारा, शोषित, पीडित, वंचित असे समूहच आहेत. अण्णा भाऊ जरी मांग या अस्पृश्य जातीत जन्माला आले तरी ते कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्ते, लेखक, कलावंत होते. कम्युनिस्ट पक्षाचे कार्डहोल्डर होते. पक्षाचे एकूण समाजव्यवस्थेविषयीचे जे आकलन होते, इतरत्र चाललेल्या चळवळीचे जे मूल्यमापन होते, वर्गलढ्यातून दुसरे सारे प्रश्न सुटत जातील हा जो ठाम सिद्धान्त पक्षाने स्वीकारलेला होता त्यावर नितांत श्रद्धा ठेवून अण्णा भाऊंनी लिखाण केले. निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केले. ज्या काळात प्रस्थापित पांढरपेशी मूल्याचा महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीवर पगडा होता त्या काळी अण्णा भाऊंनी निष्ठेने वर्गीय जाणीव स्वीकारून अतिशय समर्थपणे आपल्या पाऊलखुणा मराठी साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात उमटविल्या. नवे नायक, नवे अनुभवविश्व, नवी मूल्ये दिली. मला वाटते अण्णा भाऊंची महानता यातच आहे.
आपण सर्वच जण चळवळीतील कलावंत, लेखक, कार्यकर्ते, विचारवंत आहेत. आपणाला एक प्रदीर्घ पल्ल्याची सांस्कृतिक क्षेत्रातील लढाई लढावी लागणार आहे. आपल्यातील पुसट अशा रंगछटा विसरून या सांस्कृतिक लढाईचा किमान कार्यक्रम ठरवून त्या लढाईला सुरवात करू या. माझ्या दृष्टीने हेच अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन ठरेल.