श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

श्रमिक प्रतिष्ठानचे उपक्रम


श्रमिक प्रतिष्ठानच्या 'महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : पर्यायी दृष्टीकोन २०१५' संदर्भग्रंथाचे १ मे रोजी प्रकाशन

श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने 'महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : पर्यायी दृष्टीकोन २०१५' या संदर्भग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सायंकाळी साडेपाच वाजता करवीर नगर वाचन मंदिर येथे ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी संपादित केलेला हा शेवटचा ग्रंथ आहे. श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे, सहायक संपादक प्रा. सुनीता अमृत सागर, दिलीप पवार यांनी ही माहिती दिली.

प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी २०१२ मध्ये 'महाराष्ट्राची आर्थिक पाहणी - पर्यायी दृष्टीकोन २०१२' प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर २०१३, २०१४ आणि २०१५ मधील काही महत्त्वाच्या घाडमोडींचा समावेश करून हा ग्रंथ साकारण्यात आला आहे. २०१५ च्या ग्रंथाचे काम ऑक्टोबर २०१४ मध्येच पूर्ण झाले होते. जानेवारी २०१५ मधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन झाल्यानंतर कॉ. पानसरे प्रस्तावना लिहणार होते. पानसरे यांच्या निधनानंतर 'महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : पर्यायी दृष्टीकोन २०१२' या ग्रंथाला पानसरे यांनी लिहिलेली प्रस्तावनाच नव्या ग्रंथाला वापरण्यात येणार आहे. ११ विभागात ३६ लेख या ग्रंथात आहेत. प्रत्येक अभ्यासकाने स्वतंत्र विषय घेवून लेखन केले आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.