श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर यांच्या संकेत स्थळावर आपले स्वागत आहे.

श्रमिक प्रतिष्ठानचे उपक्रम


यांनी घडविले कोल्हापूर

देशातील एक आघाडीचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. पुरोगामी विचारांचा, शेती, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक आणि उद्योग क्षेत्रात मोठी प्रगती केलेला जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. कोल्हापूरची ही ओळख घडवण्यात अनेकांचे योगदान आहे, अशा व्यक्तींच्या कार्याची प्रचिती करून देणारी ग्रंथमाला श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वी श्रमिक प्रतिष्ठानने 'यांनी घडविले कोल्हापूर'चे दोन खंड प्रसिद्ध केले आहेत. 'एका व्यक्तीवर एक पुस्तिका'अशा दहा व्यक्तींवरील पुस्तिकांचा संच असे या खंडाचे स्वरुप आहे. या प्रकल्पातील तिसऱ्या खंडाचे काम सुरू झाले आहे.

२०१२ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या खंडातून राजर्षी शाहू महाराज, भास्करराव जाधव, डॉ. पी. सी. पाटील, संतराम पाटील, डॉ. बाळकृष्ण, भाई माधवराव बागल, जे. पी. नाईक, दादासाहेब शिर्के, वि. स. खांडेकर, आप्पासाहेब पवार, प्रा. एन. डी. पाटील यांच्या जीवनकार्यांची माहिती देणारी पुस्तके प्रकाशित करण्यात आली. तर २०१३ मध्ये दुसरा खंड प्रकाशित करण्यात आला यामध्ये राजाराम महाराज, रत्नाप्पा कुंभार, बाबूराव पेंटर, केशवराव विचारे, विमलाताई बागल, एस. पी. पी. थोरात, वाय. पी. पोवार, शांताराम गरूड, अण्णासाहेब लठ्ठे यांच्या जीवनकार्यांवरील पुस्तिकांचा समावेश आहे. श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे म्हणाले, 'कोल्हापूरला घडविण्यात ज्या व्यक्तींनी मोठे योगदान दिले आहे, अशांची चरित्रे, जीवनकार्य लोकांसमोर यावे या उद्देशाने हे काम सुरू आहे.

लवकरच तिसऱ्या खंडाचे काम सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची बैठक घेण्यात आली आहे. ज्यांची चरित्रे साकारायची आहेत, त्यांची यादीही बनवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे एका खंडात दहा व्यक्तींवरील पुस्तिका असाव्यात असे आम्ही पाहतो. एक पुस्तिका ७० ते ८० पानांची असते. याशिवाय कोल्हापूरची शाहिरी परंपरामध्ये लहरी हैदर, पिराजीराव सरनाईक, अमर शेख आणि द. ना. गव्हाणकर यांच्या कार्याचा आढावा घेण्याचे नियोजन आहे. तर कुस्ती परंपरेवर वेगळे पुस्तक असेल. कोल्हापूरच्या जडणघडणीत ज्यांचे योगदान आहे, त्यांतील अनेकांचे कार्य आजच्या पिढीला माहिती नाही. खरेतर पीएचडी किंवा एमफील होवू शकेल इतके उत्तुंग कार्य या व्यक्तींचे आहे.' तिसऱ्या खंडासाठी अल्लादियाखाँसाहेब, कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव भोसले, यशवंतराव चव्हाण, बापूसाहेब पाटील, दासराम जाधव, व्ही. शांताराम, त्र्यं.सी. कारखानीस, उर्मिला सबनीस, बाबूराव यादव, मेघनाथ नागेशकर, शंकर पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कार्यावर पुस्तिका लिहिण्याचे नियोजन आहे.